सोलापूर : जिल्ह्यात ऊस उत्पादन घटले, आतापर्यंत फत्त ८५ लाख मेट्रिक टन गाळप

सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रती दिन दीड लाखांहून अधिक असताना मागील ३४ दिवसांत अवघे ३७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर १५ नोव्हेंबर ते आजपर्यंत अवघे ८५ लाख मेट्रिक टन गाळप झाले. जिल्ह्यात ४० साखर कारखाने असले तरी पुरेसा ऊस असेल तर त्यातील ३८ कारखाने चालूअसतात. यंदा ३२ कारखाने सुरू झाले होते. मात्र, चार ते पाच कारखाने जेमतेम काही दिवसच चालले. सोलापूर जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांचे ८५ लाख १८ हजार मेट्रिक टन गाळप व ६९ लाख ५८ हजार क्विंटल साखर तयार झाली. साखर उतारा ८.१७ टक्के आहे. सद्यस्थितीत यंदा साधारण एक कोटी मेट्रिक टनांवरच हंगाम आटोपेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा बरेच साखर कारखाने उसाअभावी तीन-चार तास व त्यापेक्षा अधिक काही तास चालतात. त्यामुळे ऊस गाळप रेंगाळत सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांची प्रतिदिन एक लाख ५५ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता होती, तर जानेवारीअखेर प्रतिदिन एक लाख ५८ हजार मेट्रिक टन क्षमतेचे ३२ साखर कारखाने सुरू होते. जानेवारी महिन्यात ३२ दिवसांत अवघे ३४ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. याबाबत प्रादेशिक सहसंचालक प्रकाश अष्टेकर म्हणाले की, मागील वर्षी पाऊस कमी असल्याने उसाची नवीन लागवड झाली नव्हती. खोडव्यावरच गाळप सुरू आहे. यंदा पाऊस चांगला पडल्याने लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर ऊस तोडला आहे. १० फेब्रुवारीपर्यंत सोलापूर व धाराशिवचे बहुतेक कारखाने बंद होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here