सांगली : वसंतदादा आणि महाकाली साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू

सांगली : जिल्ह्यातील श्री दत्त इंडिया कंपनीकडे चालविण्यास असलेला वसंतदादा साखर कारखाना आणि महांकाली साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोल्हापूर विभागाचे सहसंचालक गोपाळ मावळे यांनी याची घोषणा केली. वसंतदादा साखर कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी ९ मार्च रोजी मतदान तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. महांकाली कारखान्यासाठी २३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

वसंतदादा कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारित आहे. सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव असे गट येतात. अंतिम मतदार यादीत ३६ हजारांवर मतदार नोंदवले गेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठीची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी आहे. अर्जांची छाननी १० रोजी तर वैध अर्जांची प्रसिद्धी ११ रोजी केली जाईल. त्यानंतर ११ ते २५ फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी २७ फेब्रुवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे. ९ मार्च रोजी मतदान आणि १० मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. तर दरम्यान कवठेमहांकाळ तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या महांकाली साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सत्ताधारी गटाकडून सुरू आहेत. विरोधकांनी निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत. कारखान्यासाठी ७ ते ११ फेब्रुवारी या काळात अर्ज दाखल, ११ फेब्रुवारी रोजी यादी प्रसिद्ध, अर्ज छाननी १४ फेब्रुवारी, अर्ज माघार १७ फेब्रुवारी रोजी होईल. अंतिम यादी १७ फेब्रुवारीस प्रसिद्ध होऊन २३ रोजी मतदान होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here