लातूर : रामेश्वर (ता. लातूर) येथे उभारणी करण्यात आलेल्या संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अॅण्ड अॅग्रो फूड इंडस्ट्रीज कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (4 फेब्रुवारी) बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा झाला. कारखान्यात मंगळवारी सागर महाराज गातेगावकर, नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, लालासाहेब पवार, बाबा महाराज बोराडे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नाथसिंह देशमुख आदींच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले. तत्पूर्वी सौरभ कराड आणि ऋषिकेश कराड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष राजेश कराड, मुख्य प्रवर्तक तुळशीराम कराड, बालासाहेब कराड, तेजस कराड आदी उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष राजेश कराड म्हणाले की, आपल्या हक्काचा साखर कारखाना व्हावा हे असंख्य शेतकऱ्यांनी स्वप्न पाहिले होते, ते श्री संत गोपाळबुवा महाराज शुगर मिल या साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरत आहे. उसाचे अचूक वजन, इतरांच्या बरोबरीने रास्त भाव आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मानाची निश्चितपणे काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही कराड यांनी दिली. पंधरा दिवसांत प्रत्यक्ष गाळप सुरू करून मिळेल तेवढ्या उसाचे गाळप केले जाईल. पुढच्या वर्षी विजयादशमीच्या दिवशी पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने गळीत हंगाम सुरू करण्यात येईल, असेही कराड म्हणाले.