पुणे : जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात, गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन तीस टक्क्यांनी घटले

पुणे : जिल्ह्यातील सर्व चौदा कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे सरकला आहे. सोमेश्वर, भीमाशंकर, विघ्नहर, माळेगाव सारख्या कारखान्यांकडे काही प्रमाणात उसाची उपलब्धता असल्याने त्यांचा हंगाम मार्चपर्यंत चालेल अशी शक्यता आहे. मात्र, उर्वरीत बहुतांश कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारीअखेर संपण्याची चिन्हे आहेत. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात तीस टक्क्यांपेक्षा अधिक घट होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७७ लाख ५२ हजार क्विंटल उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. नऊ टक्के साखर उताऱ्याने ६९ लाख ७६ हजार क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे.

जिल्ह्यातील ऊस गाळपात बारामती अॅग्रो तर उताऱ्यात सोमेश्वर साखर कारखाना अव्वल स्थानावर आहे. बारामती ॲग्रोने तब्बल १५ लाख टन आणि दौंड शुगरने तब्बल १० लाख टन गाळप केले आहे. त्यापाठोपाठ सोमेश्वर, माळेगाव व भीमाशंकर या कारखान्यांनी चांगले गाळप केले. मात्र अन्य कारखान्यांना गाळप वाढविण्यासाठी झगडावे लागत आहे. साखर उताऱ्यात सोमेश्वर कारखान्याने अव्वल स्थान राखले आहे. त्यापाठोपाठ संत तुकाराम कारखाना, माळेगाव, भीमाशंकर, छत्रपती, पराग अॅग्रो, छत्रपती यांचाही उतारा समाधानकारक आहे. मागील हंगामाच्या तुलनेत साखर उतारा एक टक्क्याने घसरला आहे. सहकारी कारखान्यांचा साखर उतारा १०.२० टक्के आहे तर खासगी कारखान्यांचा ७.७ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here