बेळगाव : माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याने १५ जानेवारीअखेर ४,९८,६९१ मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. त्यापोटी एकूण १५१.१० कोटी रुपये ऊस बिलाची रक्कम यापूर्वीच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. आता सहाव्या पंधरवड्याचे ऊस बिल, २६.११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली. कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ ची सांगता सोमवारी (ता. १०) होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याचे अध्यक्ष पाटील, कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे यांनी सांगितले की, गळीत हंगामाची सोमवारी सांगता होणार आहे. यामुळे अद्याप ऊस न दिलेल्या सभासद किंवा बिगर सभासदांनी आपल्या जबाबदारीवर तोडणी, ओढणीसह ऊस कारखान्यात वेळेत पुरवावा. त्यासाठी कुठलीही मदत हवी असल्यास कारखाना कार्यालयाशी संपर्क साधावा. कारखान्याकडून शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या विकासासाठी वेगवेगळ्या स्तरावर नवे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा लाभ अनेकांना होत आहे. आगामी कालात अनेक महत्वाकांक्षी उपक्रम राबविले जाणार आहेत.