कीव : युक्रेनच्या साखर उत्पादकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या उक्रशुगरने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने मार्केटिंग वर्षाच्या, सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या पहिल्या पाच महिन्यांत ३,५२,००० टनांपेक्षा जास्त साखर निर्यात केली आहे. मागील मार्केटिंग वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ही निर्यात १७ टक्क्यांनी जास्त आहे. ही सर्व निर्यात जागतिक बाजारपेठेत निर्देशित करण्यात आली. तर सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये केवळ ९.५ टक्के निर्यात जागतिक बाजारपेठेत गेली.
या २०२४-२५ मार्केटिंग वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत युक्रेनियन साखरेची मुख्य निर्यात ठिकाणे तुर्की (एकूण निर्यातीच्या १९ टक्के), लिबिया, सोमालिया, श्रीलंका, उत्तर मॅसेडोनिया होती. एक जानेवारी २०२५ पासून, युक्रेनमधून युरोपियन युनियन देशांमध्ये साखर निर्यात करण्याची शक्यता पुन्हा सुरू झाली आहे. २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांत, युक्रेन युरोपियन युनियनला १,०७,३०० टन साखर निर्यात करू शकेल. कोटा ओलांडल्यामुळे, युरोपियन युनियनने २ जुलै २०२४ पासून युक्रेनमधून येणाऱ्या अंडी, साखरेवरील शुल्क पुन्हा लागू केले. त्यानंतर, युक्रेनमधून साखर निर्यात गंभीर स्तरापर्यंत घसरली.
३१ ऑगस्ट रोजी संपलेल्या २०२३-२०२४ च्या मार्केटिंग हंगामात, युक्रेनने सुमारे ६,९२,००० टन साखर निर्यात केली. मागील वर्षीच्या तुलनेत ती जवळजवळ ६० टक्के जास्त आहे. त्या काळात तात्पुरती निर्यात बंदी होती. युक्रेनियन साखर निर्यातीपैकी ७७ टक्के साखर युरोपियन युनियन देशांमध्ये गेली. ३१ जानेवारी रोजी, कृषी धोरण आणि अन्न मंत्रालयाने २०२५ साठी युरोपियन युनियनसाठी साखरेचा कोटा वाटप केला.