सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत २१ जागांसाठी १४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या दाखल अर्जाची छाननी सोमवारी होणार आहे. त्यानंतर ११ ते २५ फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. कारखाना निवडणूक लागणार की बिनविरोध होणार, यावर २५ तारखेला शिक्कामोर्तब होणार आहे. बिनविरोध न झाल्यास ९ मार्च रोजी मतदान होणार आहे. वसंतदादा साखर कारखाना सध्या १० वर्षे मुदतीसाठी दत्त इंडिया कंपनीस चालविण्यास देण्यात आला आहे. दत्त इंडियाचा यंदाचा आठवा गळीत हंगाम आहे.
वसंतदादा कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे. कारखान्याचे ३६ हजार मतदार आहेत. यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटांमधून प्रत्येकी ३ असे १५, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदारसंघ क्रमांक २, तसेच अनुसूचित जाती किंवा जमाती मागासवर्गीय १, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गामधून १ असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये व्यक्ती उत्पादक गटातून विद्यमान अध्यक्ष खासदार विशाल पाटील, हर्षवर्धन पाटील, उदयसिंह कदम, दिनकर साळुंखे, राजेश एडके, प्रदीप मगदूम, प्रवीण पाटील, बजरंग पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.