सोलापूर : एफआरपी थकवणाऱ्या १३ साखर कारखान्यांना प्रादेशिक साखर सहसंचालकानी बजावल्या नोटिसा

सोलापूर : जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊसबिले दिली नाहीत. अशा साखर कारखान्यांना प्रादेशिक साखर सहसंचालक प्रकाश आष्टेकर यांनी नोटिसा बजावल्या आहेत. गुरुवारी (ता.१३) साखर आयुक्तालयात या विषयावरील सुनावणी ठेवली आहे. गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असताना साखर कारखाने पूर्ण एफआरपी देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. ऊस कारखान्याला जावून अनेक दिवस उलटले तरी पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, माढा येथील भैरवनाथ शुगर वर्क्स, बार्शीतील बबनरावजी शिदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रिज, इंद्रेश्वर शुगरमिल्स, मोहोळ येथील लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रिज, जकराया शुगर, मंगळवेढा येथील आवताडे शुगर, युटोपियन शुगर्स, सांगोला येथील धाराशिव शुगर, , लवंगी (ता. मंगळवेढा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स, उत्तर सोलापूरमधील लोकमंगल शुगर इथेनॉल अॅण्ड कोजनरेशन इंडस्ट्रीज, सिद्धनाथ शुगर, दक्षिण सोलापुरातील लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रिज या कारखान्यांचा यात समावेश आहे. रयतक्रांती शेतकरी संघटनेचे नेते, ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी यासंबंधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत साखर सहसंचालकांनी कारखान्यांना नोटिसा काढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here