पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. इच्छुक उमेदवारांना शुक्रवार, १४ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी ११ ते ३ यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी १७ फेब्रुवारी रोजी होईल. अर्ज माघारीची १८ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत आहे. ५ मार्च रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. तर १५ मार्च रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत मतदान होई. १६ मार्च रोजी मतमोजणी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे काम पाहत आहेत.
विघ्नहर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. यात उत्पादक सभासद मतदार संघाच्या जुन्नर, शिरोली बुद्रुक, पिंपळवंडी व घोडेगाव गटातून प्रत्येकी तीन तर ओतूर गटातून चार, असे एकूण १६ संचालक तसेच अनुसूचित जाती / जमाती एक प्रतिनिधी, महिला राखीव प्रतिनिधी दोन, इतर मागासवर्गीय एक प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील एक प्रतिनिधी अशा जागा आहेत. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी पहिल्याच दिवशी उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदारसंघांच्या शिरोली बुद्रुक गटातून अर्ज दाखल केला.