पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 10 फेब्रुवारी 2025 अखेर एकूण 200 साखर कारखाने सुरू आहेत. या साखर कारखान्यांनी 701.94 लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत 644.4 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर रिकव्हरी दर सुमारे 9.18 टक्के इतका आहे. राज्यातील 16 साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. मागील वर्षी याच काळात 207 साखर कारखान्यांनी 782.56 लाख टन उसाचे गाळप करून 763.79 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर रिकव्हरी दर सुमारे 9.76 टक्के इतका होता. तसेच 8 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला होता.
पुणे विभागात 165.44 लाख टन उसाचे गाळप झाले असून सरासरी साखर उत्पादन 152.52 लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 9.22 टक्के आहे. विभागात 31 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. कोल्हापूर विभागात 40 कारखाने (26 सहकारी आणि 14 खाजगी) आहेत. या कारखान्यांनी 171.41 लाख टन उसाचे गाळप केले असून, 185.79 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक 10.84 टक्के साखर उतारा आहे. सोलापूर विभागात 13 साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. आतापर्यंत विभागात 120.21 लाख टन उसाचे गाळप करून 95.78 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा 7.97 टक्के आहे. अहमदनगर विभागात 26 कारखाने कार्यरत असून त्यापैकी 14 सहकारी आणि 12 खाजगी आहेत. या कारखान्यांनी 89.95 लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण 77.52 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.62 टक्के आहे.
नांदेडमध्ये 10 सहकारी आणि 19 खाजगी अशा एकूण 29 कारखान्यांनी 79.4 लाख टन उसाचे गाळप केले असून 9.39 टक्के साखर उताऱ्यासह 74.54 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील 3 साखर कारखाने बंद झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखान्यांनी (13 सहकारी आणि 9 खाजगी) 65.46 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी 50.29 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाच उतारा 7.68 टक्के आहे. अमरावती विभागात चार साखर कारखान्यांनी काम सुरू केले असून त्यात एक सहकारी आणि तीन खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 7.9 लाख टन उसाचे गाळप केले असून, 6.82 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.63 टक्के आहे. नागपूर विभागात 3 खाजगी कारखाने सुरु असून त्यांनी 2.17 लाख टन उसाचे गाळप करून 1.14 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी 5.25 टक्के इतका आहे.