दुबईतील जागतिक साखर परिषद उद्योगासाठी दिशादर्शक ठरेल : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील

पुणे : दुबई येथे जागतिक साखर उद्योगाची नववी दुबई साखर परिषद २०२५ सुरू झाली आहे. या परिषदेमध्ये भारतासाठी आपण पुढे काय पाहणार आहोत ? या विषयावरील चर्चासत्रात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व मान्यवर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारताचे साखर निर्यात धोरण, भारतामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, या संदर्भातही यावेळी हर्षवर्धन पाटील मत मांडतील. परिषदेत अमित देशमुख, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अंकिता पाटील-ठाकरे, निहार ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्यासह केंद्रीय सचिव दर्जाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. परिषदेमध्ये जगातील ७० देशातील साखर उद्योगाच्या प्रतिनिधींनी सहभाग आहे.

याबाबत हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शुगर परिषदेमध्ये डिजिटल शेती, ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार, पाण्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी भांडवल जमवणे, साखरेच्या आरोग्यासंदर्भात चुकीच्या अफवा, तापमान वाढीची चिंता या संदर्भात चर्चा होणार आहेत. साखर उद्योगातील तंत्रज्ञान, आधुनिकता, साखर व्यापार, साखर उद्योगापुढील आव्हाने या संदर्भात जगातील साखर उद्योगातील तज्ञ या परिषदेत विचार मांडणार आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. साखर उद्योगाचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून सतर्कता बाळगणे या संदर्भातील विषयावर परिषदेत चर्चा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here