सोलापूर : माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामधील एका कर्मचाऱ्याच्या मुलाने कार्यकारी संचालक (एमडी) पदासाठीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. साखर कारखाना कामगाराचा मुलगा शिकून फायनान्स मॅनेजर झाला. आता त्याने अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर थेट कार्यकारी संचालकपदी झेप घेतली आहे. हनुमंत नवनाथ करवर असे त्यांचे नाव असून ते पंढरपूर तालुक्यातील करोळे गावचे आहेत.
हनुमंत यांचे वडील नवनाथ करवर हे श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये फिडपंप मॅन म्हणून काम करतात. तर हनुमंत हे बारामती तालुक्यातील भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये सन २०२० पासून फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील हनुमंत यांनी अभ्यास, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अनेक साखर कारखान्यांमध्ये विविध पदांवर नोकरी केली आहे. उच्च शिक्षण घेताना त्यांनी वित्तीय क्षेत्रात जबाबदारी सांभाळली. फायनान्स मॅनेजर म्हणून काम करताना त्यांनी वडिलांचे नाव आणखी मोठे केले. करवर यांचा कारखान्याच्या वतीने अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक अॅड. रणजित निंबाळकर, नारायण कोळेकर, राजेंद्र गावडे, रसिक सरक, अशोक नवले, कामगार नेते युवराज रणवरे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.