कोल्हापूर : राज्यातील ऊस तोडणी मुकादमांनी शेतकरी तसेच वाहतुकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. याबाबत दोन हजारांहून अधिक तक्रारी दिल्या आहेत. यासंदर्भात गुन्हे दाखल होऊनही याबाबत पोलीस यंत्रणेकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. राज्यातील ‘बड्या’ नेत्यांच्या वरदहस्तामुळे वाहतूकदारांची फसवणूक केलेले मुकादम बिनबोभाट फिरू लागले आहेत. हे गुन्हे निपटारा होण्यासाठी फार कालावधी होत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने बैठक लावून वसुलीसंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
संदीप राजोबा, राजू पाटील, रावसाहेब अबदान, दादा पाटील, विनोद पाटील, तानाजी पाटील यांच्यासह वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शेट्टी म्हणाले की, फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदारांना बँका, पतसंस्थांच्या मुद्दल आणि व्याजाचा भुर्दंड बसत आहे. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे कायद्यामध्ये योग्य तो बदल करून फसवणूक करणाऱ्यांचे गुन्हे ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टामध्ये चालवावेत. वसुलीसाठी गेलेल्या पोलिस व वाहतुकदारांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून ‘अॅडव्हान्स’ रक्कम बुडवण्याचा कट रचला जात आहे. त्याचीही दखल घ्यावी. सरकारने गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळात ऊस वाहतूकदार यांचाही समावेश करून ऊस वाहतूकदारांनाही संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.