सहकारी साखर कारखाने टिकवण्याची सर्वांचीच जबाबदारी : अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप

पुणे : सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सहकार टिकला नाही, तर शेतकरी अडचणीत येईल. सहकारी साखर कारखाने चांगले चालवले, तर खासगी कारखान्यांना आपण थोपवू शकतो. खासगीचे वर्चस्व निर्माण झाले, तर भविष्यात अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे असे प्रतिपादन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्यावतीने सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे आयोजित नेतृत्व विकास कार्यक्रमात ते बोलत होते. खासगी साखर कारखान्यांची वाढती संख्या लक्षात घेता सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी जबाबदारीने काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

निरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार म्हणाले, खासगी कारखाने काही काळ बरे वाटतात. मात्र, नंतर त्यांची मक्तेदारी निर्माण होऊन वाईट दिवस येतात. सोमेश्वरचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सचिव कालिदास निकम, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर, व्याख्याते अॅड. महेंद्र खरात, पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, व्हीएसआय पुणेचे डॉ. अशोक कडलग, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. तुषार शितोळे आदी उपस्थित होते. चेतन भोसले यांनी सूत्रसंचालन केले. कामगार अधिकारी दीपक निंबाळकर आभार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here