पुणे : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी, दि. ११ फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत २०२२-२३ पासून राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ऊस तोडणी यंत्रांसाठी केंद्र सरकारच्या हिश्शाची १४१ लाभार्थ्यांना देय असलेली रक्कम वितरित करण्याबाबत राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती केली होती. त्यावर राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली.
कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमनार, केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे सहसचिव व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ऊस तोडणी यंत्र खरेदी किमतीच्या ४० टक्के अथवा कमाल ३५ लाख रुपये अनुदान देण्यात येते. योजनेअंतर्गत ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी सरकारने मान्यता दिली आहे. राज्यातील पात्र २५७ लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी ११६ लाभार्थ्यांना अनुदान मिळाले आहे. उर्वरित १४१ लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या हिश्शाची रक्कम त्वरित मिळावी अशी मागणी कोकाटे यांनी बैठकीत केली. यावर सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारला त्वरित सादर करण्याचे गडकरी यांनी निर्देश दिले.