साखर निर्यात बाजारपेठेत भारताचे वर्चस्व कायम राहील : केंद्रीय संयुक्त अन्न सचिव अश्विनी श्रीवास्तव

नवी दिल्ली : भारताने यंदा १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे जागतिक साखरेच्या किमतींवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यांदरम्यान, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या संयुक्त सचिव अश्विनी श्रीवास्तव यांनी यावर्षीही भारत साखर निर्यात बाजारात कायम राहील, असे विधान केले आहे. डिसेंबरपासून एफएओ साखरेच्या किमती निर्देशांकात ६.८ टक्क्यांनी लक्षणीय घट झाली आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत यामध्ये १८.५ टक्के घट झाली आहे. ब्राझीलमधील अनुकूल हवामान आणि भारताने साखर निर्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जागतिक पुरवठ्याच्या शक्यतांमध्ये सुधारणा झाल्यामुळे साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे.

केंद्र सरकारने २० जानेवारी रोजी साखर उद्योगाच्या निर्यात मागणीनुसार दहा लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, सरकार दरवर्षी १५ हजार टन विशेष साखर निर्यात करण्याचा विचार करत आहे असे सांगण्यात आले होते असे अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तामध्ये म्हटले आहे. विशेष साखरेमध्ये आयसिंग शुगर, डेमेरारा-शैलीतील साखर, गोल्डन सिरप आणि बरेच काही समाविष्ट आहे. हे बेकिंग आणि स्वयंपाकात वापरले जातात. दरम्यान, भारतातील सर्वात मोठ्या एकिकृत साखर उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या बलरामपूर चिनी मिल्सच्या कार्यकारी संचालक अवंतिका सरावगी यांनी बिझनेसलाइनला सांगितले की, सरकारने यावर्षी पुन्हा इथेनॉलच्या किमती वाढवल्या नाहीत. परंतु विशिष्ट प्रमाणात साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे साखरेच्या किमती मजबूत राहिल्या आहेत.

तर इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स (इस्मा)ने या हंगामात सप्टेंबरपर्यंत २७.२७ दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने उत्पादनाचा आकडा २६.५२ दशलक्ष टन ठेवला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने २७.१० दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. इथेनॉलसाठी ४ दशलक्ष टन साखरेचे डायव्हर्शन केले जाईल अशी शक्यता गृहित धरून हे अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here