सोलापूर : माळशिरस तालुक्यातील तीन कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. उर्वरित दोन कारखान्यांचा हंगाम आठवडाभरात बंद होणार आहे. तालुक्यात चालू हंगामात पाच साखर कारखान्यांनी आतापर्यंत २१,०१,२३२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. आजअखेर १९,१८,२५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. मागील हंगामात पाच साखर कारखान्यात २९ लाख पाच हजार ८६४ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन २८ लाख ३१ हजार २९५ क्विंटल साखर निर्माण झाले होते. गेल्या हंगामातील दुष्काळी स्थितीमुळे घटलेले उत्पादन, जादा दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिल्याने काही कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर झाला. तर पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील काही कारखान्यांनी तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेला.
तालुक्यातील सासवड माळी (माळीनगर) आणि श्री शंकर (सदाशिवनगर) या दोन कारखान्यांचे गाळप संपु्ष्टात आले आहे. तर सहकारमहर्षी (अकलूज), पांडुरंग (श्रीपूर), ओंकार शुगर (चांदापुरी) हे तीन साखर कारखाने सुरू आहेत. यावर्षी पांडुरंग कारखाना गाळपात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर तर सरासरी साखर उताऱ्यात पहिल्या स्थानावर आहे. यंदा अपुऱ्या ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेमुळे कारखान्यांना पुरेशा प्रमाणात उसाचा पुरवठा होताना अडचणी निर्माण झाल्या. सद्यस्थितीत श्रीपूरचा पांडुरंग व चांदापुरीचा ओंकार शुगर हे कारखाने अद्याप सुरू आहेत. पांडुरंग कारखान्याचा गाळप हंगाम २० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तोपर्यंत आठ लाख टन गाळप पूर्ण होईल, अशी कारखाना व्यवस्थापनाला आशा आहे. यंदा ३० ते ३५ टक्के गाळप घटल्याचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.