मुंबई : राज्य साखर संघ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचा उद्योग करीत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली. एकरकमी एफआरपीचा नियम कायम करण्याच्या उच्च न्यायालयातील याचिकेवरील निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मात्र, राज्य साखर संघाने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर मुदत मागवण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेट्टी यांनी साखर संघावर हल्लाबोल केला. तीन वर्षांपूर्वी हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानंतर साखर संघाने सुनावणीवेळी बाजू मांडणे गरजेचे होते. मात्र गेल्या तीन वर्षात सुनावणीस साखर संघाकडून कोणीही पदाधिकारी, अधिकारी, वकील, कर्मचारी जाणीवपूर्वक उपस्थित राहिले नाहीत असा आरोप त्यांनी केला.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, राज्य साखर संघाने कारखानदारीच्या हितासाठी आजपर्यंत काहीच केलेले नाही. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसातून वर्षाला पाच कोटी रुपयांची वर्गणी साखर संघ घेते. राज्य साखर संघाने कारखानदारीच्या हितासाठी आजपर्यंत कोणतेच पाऊल उचलले नाही. सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विकले जात असताना त्याचा कधी चौकशी अहवाल तयार केला नाही. ऊस वाहतूकदार मुकादमांच्या फसवणुकीत संकटात सापडला असताना त्या प्रश्नात कधी लक्ष घालावासे वाटले नाही. याचिकेचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागेल असे वाटल्याने आता म्हणणे सादर करण्यास वेळ मागून घेतल्याची टीका शेट्टी यांनी केली.