नाशिक : आदिवासी ऊस उत्पादकांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) यांच्यामार्फत ऊस उत्पादन वाढ योजना राबवण्यात येते. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) या संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येते. यावेळी मंत्रालयामार्फत ऊस उत्पादन वाढ कार्यक्रमासाठी द्वारकाधीश साखर कारखान्याच्या १५ ऊस उत्पादकांची निवड झाली आहे. कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी ही माहिती दिली.
द्वारकाधीश कारखान्याने १५ ऊस उत्पादक शेतकऱ्यांची निवड या योजनेसाठी केली. या ऊस उत्पादकांना उसाचे उत्पन्न वाढीव तंत्र अवगत होण्यासाठी कारखान्यामार्फत चार दिवसाचे प्रशिक्षण पुणे येथे दिले. अध्यक्ष सावंत यांच्या हस्ते ऊस उत्पादकांना नऊ लाख ५७ हजार ७५० रुपयांचे बेणे, खते, ठिबक सिंचन साहित्य, कृषी निविष्ठांचे मोफत वाटप कारखाना स्थळावर केले. ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना अधिकारी शिवाजी भालेराव, बाळासाहेब करपे, विजय वाघ, विजय पगार, सतीश सोनवणे, हेमंत खैरनार उपस्थित होते. सहभागी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘व्हीएसआय’ (पुणे) येथे तांत्रिक प्रशिक्षण, पायाभूत बेणे, खते, ठिबक सिंचन साहित्य इत्यादी निविष्ठा मोफत देण्यात येतात.