पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ९३ दिवसांमध्ये ८ लाख ६१ हजार टन उसाचे गाळप केले असून सरासरी ११.५१ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख ८८ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी बाहेरच्या कारखान्यांच्या प्रलोभनास बळी पडून अन्यत्र ऊस घालू नये, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. जर सभासदांनी नोंदविलेला ऊस बाहेरच्या कारखान्यांना घातला तर कारखान्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, कारखाना कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप २५ मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल. कोणाचाही ऊस शिल्लक राहू दिला जाणार नाही. कारखान्याची गाळप क्षमता ७५०० टन प्रतिदिन असतानाही सरासरी ९२६२ टन प्रतिदिन क्षमतेने गाळप सुरू आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ६ कोटी १४ लाख युनिट वीजनिर्मिती केली असून त्यापैकी ३ कोटी ५७ लाख युनिट वीज वीजकंपनीस विक्री केलेली आहे.याशिवाय डिस्टिलरी प्रकल्पातून ४२ लाख ६० हजार लिटर अल्कोहोलचे तर २३ लाख १७ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. दरम्यान, अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, ऊसतोड कामगार जर “ तोडणीसाठी पैसे मागत असतील किंवा बिगरसहमतीने ऊस जळीत करून तोडत असतील तर लेखी तक्रार दिल्यास त्यांच्या ऊसतोडणी बिलातून वसुली केली जाईल.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.