पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा यंदा २०२४-२५ चा ऊस गाळप हंगामास १५ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. तर ‘एफआरपी’च्या अहवालाप्रमाणे १५ जानेवारीअखेर म्हणजे दोन महिन्यांच्या हंगामात एकूण ४९६ लाख १९ हजार मेट्रिक टनांइतके ऊस गाळप कारखान्यांनी पूर्ण केले. साखर कारखान्यांनी १५ जानेवारीअखेर गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीच्या १६ हजार ५७७ कोटींपैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १३ हजार ९८२ कोटी रुपये जमा केलेले आहेत.
तत्कालीन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी नुकताच केंद्रीय मुख्य संचालकांना (साखर) पाठविलेल्या अहवालानुसार, देय एफआरपी रकमेच्या तुलनेत शेतकऱ्यांना दिलेल्या एफआरपीचे प्रमाण ८४.३५ टक्क्यांइतके आहे. त्यामध्येही ६६ कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. तर ३७ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के रक्कम दिली आहे. आणखी ३७ कारखान्यानी ६० ते ७९ टक्के एफआरपी दिली आहे. तर ५९ कारखान्यांनी शून्य ते ५९ टक्के एफआरपी दिली आहे. एफआरपीच्या थकीत रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर मिळण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडून विशेष कार्यवाही करून कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.