पुणे : जिल्ह्यातील चौदा कारखाने सुरू होऊन ९४ दिवस झाले. आताच काही कारखान्यांचा ऊस संपत आला आहे. तर सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर, भीमाशंकर, संत तुकाराम अशा निवडक कारखान्यांचा हंगाम मार्चमध्येही जाणार आहे. सद्यस्थितीत, गेल्या तीन महिन्यांत कारखान्यांनी ९० लाख टन ऊस गाळप केले असून ८२ लाख २६ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. मात्र, साखरेचा उतारा गेल्या हंगामाच्या तुलनेत जवळजवळ एक टक्क्याने घटला. सद्यस्थितीत साखर उतारा फक्त ९.१२ टक्के आहे. जिल्ह्यात मागील हंगामात १३३ लाख टन गाळप पूर्ण होऊन १३९ लाख क्विंटल साखरनिर्मिती झाली होती.
जिल्ह्यात चालू हंगामात उतारा अवघा ९.१२ टक्क्यांवरच अडकला आहे. सध्या सोमेश्वरचा उतारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा असून त्यापाठोपाठ संत तुकाराम, माळेगाव, छत्रपती, भीमाशंकर, विघ्नहर आणि पराग अॅग्रो यांचेही उतारे समाधानकारक आहेत. दरम्यान, गाळपात मात्र बारामती ॲग्रो (१६ लाख टन) व दौंड शुगर (१३ लाख टन) या दोनच कारखान्यांनी तब्बल चाळीस लाख टन गाळप केले आहे आणि उर्वरित बारा कारखान्यांनी पन्नास लाख टनांचे गाळप केले आहे.सोमेश्वर व संत तुकाराम कारखान्यांचाच साखर उतारा उत्तम आहे. गाळपात अनेक कारखाने पिछाडीवर असल्याने चालू हंगाम आर्थिक अडचणींचाच ठरणार आहे.