पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याकडे नोंदवलेल्या संपूर्ण उसाचे गाळप २० ते २५ मार्चपर्यंत संपविण्याचे प्रयत्न आहेत. नोंदवलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यास संचालक मंडळ कटिबध्द आहे. सभासद शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये. जर कारखान्याकडे नोंदविला ऊस बाहेरील कारखान्यास घातल्यास सभासदांच्या सर्व सवलती बंद करण्याचा निर्णय सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला आहे असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिला.
याबाबत जगताप यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सोमेश्वरने ९३ दिवसांत ८ लाख ६१ हजार प्रति दिन असतानाही ९२६२ मे. टनाच्या उच्चांकी सरासरीने गाळप केले जात आहे. कारखान्याने आतापर्यंत सरासरी ११.५१ टक्के साखर उतारा राखत ९ लाख ८८ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. दैनंदिन साखर गाळप क्षमता ७५०० टन कारखान्याने पूर्व हंगामी, सुरू व खोडवा ऊसास अनुदानही दिलेले असताना बाहेरील कारखान्यांना ऊस घालून सभासदांनी आपले नुकसान करून घेऊ नये. याचबरोबर ऊस तोडीसाठी शेतकऱ्याकडून पैसे घेतल्यास कामगारांच्या बिलातून ते वसूल केले जातील. सहमतीशिवाय सभासदांचा ऊस जळीत केल्यास व तसे आढळल्यास ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेच्या ऊसवाहतूक बिलातून जळीताची रक्कम वसूल करून संबंधीतास देण्यात येईल. सभासदांनी तात्पुरत्या प्रलोभनाला बळी न पडता स्वतःचे आर्थिक नुकसान करून कारखान्याकडे नोंदलेला ऊस बाहेर देऊन कारखान्याबरोबर केलेल्या ऊस नोंद कराराचा भंग करू नये.