सांगली : तुरची (ता. तासगाव) येथील तासगाव कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामात आणि कारखान्याच्या इतिहासात प्रथमच नीचांकी ऊस गाळप झाले. कारखाना भाडेतत्त्वावर देऊनही कारखान्याच्या मागील शुक्लकाष्ठ संपले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तासगाव कारखाना स्थापनेपासून वादग्रस्त राहिला आहे. सुरुवातीच्या काळात अगदी पहिल्या पाच वर्षांत दिनकरआबा पाटील यांनी कारखाना कर्जमुक्त केला होता. मात्र संस्थापक दिनकर आबा पाटील यांच्याविरोधात डॉ. पतंगराव कदम व आर. आर. पाटील समर्थकांनी अविश्वास ठराव दाखल करून कारखाना हिसकावून घेतला. मात्र कदम व पाटील समर्थकांना कारखाना सक्षमपणे चालविता आला नाही किंबहुना त्यामुळे कारखाना विकावा लागला.
माजी खासदार संजय पाटील यांनी हा कारखाना राज्य सहकारी बँकेकडून विकत घेतला. त्यांनी काही काळ कारखान्याचे गाळप हंगाम घेतले. त्यांनाही पूर्ण क्षमतेने कारखाना चालविता आला नाही. मात्र दिवसेंदिवस कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला. शेतकरी, कामगार, व्यापारी यांची देणी वाढत गेली. ऊस उत्पादक शेतकरी ऊस बिले थकल्याने कमालीचे नाराज झाले. त्यामुळे संजय पाटील यांनी कारखाना माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या यड्रावकर इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड यांना भाडेकरारावर दिला आहे. कंपनीने यावर्षी पहिल्यांदाच गाळप हंगाम घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीला गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालविण्यात पूर्ण अपयश आले. चालू हंगामात ६५ दिवस गाळप सुरू होते. या कालावधीत केवळ ८५ हजार मेट्रिक टनाचे ऊस गाळप करण्यात आले आहे. ६२ हजार क्लिंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हे गाळप आणि साखर उत्पादन कारखान्याच्या इतिहासातील नीचांकी ठरले आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.