मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. सालिमठ हे राज्याच्या प्रशासनातील अनुभवी अधिकारी असून, २०११ च्या त्यांना आयएएस श्रेणीत पदोन्नती मिळाली होती. ते फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या काळात अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. विद्यमान आयुक्त खेमनार यांची मुंबईत सिडकोच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
नवे आयुक्त सिद्धराम सालीमठ हे १९९५ पासून ते प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी महसूल, शहरी विकास, जमीन अधिग्रहण या विषयांवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे. सिडकोत येण्याआधी त्यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी कृषी संशोधन विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. सिधुंदुर्ग, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांसह कोकण विभागीय महसूल विभागाच्या उपायुक्त पदांवरही त्यांनी काम केले आहे.सालीमठ यांनी सिडको, एमएमआरडीए हाताळत असलेल्या न्हावा शेवा शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, एमयूटीपी, एमआरव्हीसी, उन्नत रेल्वे मार्ग अशा विविध प्रकल्पांमधील समस्याही हाताळल्या आहेत.