पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्तीच्या वाटेवर आहे. यांदरम्यान, साखर आयुक्तालयाने घेतलेल्या आढाव्यात जवळपास ९६ साखर कारखान्यांनी एफआरपी थकवल्याचे समोर आले आहे. साखर कारखान्यांनी एकूण ४९६ लाख १९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. साखर कारखान्यांनी १५ जानेवारीअखेर गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीच्या १६ हजार ५७७ कोटींपैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १३ हजार ९८२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, असे ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. याशिवाय, कारखान्यांचे गाळप पूर्ण होऊन बंद होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहे. यावर्षी २५ कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये २१ कारखाने केवळ सोलापूर विभागातील आहेत. चालू हंगामात २०० हून अधिक साखर कारखान्यांना गाळप करण्यास परवानगी देण्यात आली होती.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या अहवालानुसार, राज्यातील साखर कारखान्यांकडून ८४.३५ टक्के एफआरपी देण्यात आली आहे. २०० पैकी ६६ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. तर ३७ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के रक्कम दिली आहे. आणखी ३७ कारखान्यानी ६० ते ७९ टक्के एफआरपी दिली आहे. तर ५९ कारखान्यांनी शून्य ते ५९ टक्के एफआरपी दिली आहे. एफआरपी थकल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कारखान्यांवर साखर आयुक्त कार्यालयाकडून कारवाई होणार का? असा प्रश्न शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.