कोल्हापूर, ता. 6 : उद्योगाला दिली जाणारी साखर जास्त दराने आणि किरकोळ किंवा घरगुती वापरासाठी दिली जाणारी साखर कमी दराने विक्री करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. याबाबत शासन सकारात्मक आहे लवकरच हा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे साखर कारखाने आणि शेतकऱ्यांच्या या फायद्याचा ठरणार असल्याची माहिती प्रकाश नाईकनवरे यांनी आज दिली. पुणे येथे साखर परिषदे 2020 सुरू आहे .यावेळी ते बोलत होते.
श्री नाईकनवरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून साखरेला दर मिळत नाही. तरीही घरगुती वापरासाठीही त्याच दरात आणि उद्योग व्यवसायासाठी वापरली जाणारी साखरही त्याच दरात दिली जात असल्यामुळे साखर कारखाने आणि पर्यायाने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उद्योगांना साखरेचा दर जास्त असावा आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या साखरेचा दर कमी असावा, अशी मागणी होत होती. या मागणीनुसार सरकारने आता उद्योगाकडून घेतल्या जाणाऱ्या साखरेवरती जास्त कर आकारणी करावी आणि घरगुती साखर वापरणाऱ्यांवर कमी कर आकारणी करावी, असे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान हे करत असतानाच घरगुती वापरासाठीच्या साखरेच्या पोत्याचा रंग वेगळा आणि उद्योगासाठी लागणाऱ्या साखरेच्या पोत्याचा रंग वेगळा करावा लागणार आहे, याचेही नियोजन झाले आहे. दरम्यान लवकरच हा निर्णय होणार असून शेतकऱ्यांना आणि विशेषत: साखर कारखान्यांनाही याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती श्री नाईकनवरे यांनी दिली.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.