सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या युनिट नं. १ पिंपळनेर या कारखान्याच्या सन २०२४-२५ या हंगामाची सांगता ७ लाख ९ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संस्थापक-चेअरमन, माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करून करण्यात आली. यंदा दोन्ही युनिटने मिळून १४ लाख ९२ हजार ५५६ मे. टन उसाचे गाळप झाले आहे.
माजी आ. बबनराव शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामापासून दहा दिवसाला उसाचे पेमेंट देण्याची सुरू केलेली परंपरा यावर्षदिखील कायम ठेवली आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या युनिट नं. १ पिंपळनेर या कारखान्याने सन २०२४-२५ गळीत हंगामात आजअखेर युनिट नं.१ कडे ११ लाख १६ हजार ८१८ मे. टन उसाचे गाळप होऊन २०.८४ टक्के साखर उताऱ्याने ७ लाख १० हजार ८०० क्विन्टल साखर पोती उत्पादित झाली आहेत.
युनिट नं. २ कडे ३ लाख ७५ हजार ७३८ मे. टन उसाचे गाळप होऊन १०.९५ टक्के साखर उताऱ्याने ३ लाख ५६ हजार ५०० किं. साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. दोन्हीं युनिटचे मिळून १४ लाख ९२ हजार ५५६ मे. टन गाळप होऊन १० लाख ६७ हजार ३०० किं. साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. दोन्ही युनिटचे मिळून ५ कोटी ३५ लाख ९१ हजार ५०० युनिट बीज विक्री करण्यात आलेली आहे. या हंगामामध्ये युनिट नं. १ चे डिस्टीलरी विभागाकडे शुगर सिरपपासून २ कोटी २१ लाख ब.लि. इथेनॉल व २ कोटी ७१ लाख ४७हजार स्पिरीट उत्पादन झाले आहे.
या हंगामात गाळपास आलेल्या उसास प्रति मे. टन रू. २८०० रु. प्रमाणे रकम अदा करण्यात करण्यात आली असून या हंगामात ऊस बिलापोटी आजअखेर रू. ३४३ कोटी २१ लाख व तोडणी वाहतूक बिलासाठी रू. ७८ कोटी ७२ लाख अदा करण्यात आले आहेत. दोन्ही युनिटकडील यशस्वी कामकाजासाठी कारखान्यात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना पंधरा दिवसांचा पगाराइतकी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, संचालक लक्ष्मण खुपसे, शिबाजी डोके, रमेश येवले-पाटील, वेताळ जाधव, लाला मोरे आदी उपस्थित होते.