पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीबाबतचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाला, तरी या कारखान्याची मालमत्ता ताब्यात असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या परवानगीशिवाय जमीन विक्री अशक्य असल्याचे सहकारातील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
कारखान्यावर असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या थकीत कर्जाबाबत बैठक झाल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये कारखान्यावरील कर्जाबाबत राज्य बँकेत एकरकमी कर्ज परतफेडीबाबत (ओटीएस) तोडगा निघाल्याची माहिती मिळत आहे. राज्य बँकेबरोबर ओटीएस निश्चित करून त्यांची जमीन | विक्रीस परवानगी घेणे आवश्यक आहे किंवा लेखी पत्र घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मात्र, जोपर्यंत कारखान्याकडून तडजोडीची ठरलेली रक्कम बँकेस दिली जात नाही, तोपर्यंत बँक जागा विक्रीस मंजुरीचे पत्र कसे देणार? असा कायदेशीर मुद्दा उपस्थित झाल्याचे समजते. त्यामुळे बँकेच्या संमतीशिवाय त्यांच्या ताब्यातील जमीन विक्रीचा अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेला नव्हे आहे काय ? असाही प्रश्न उपस्थित झाल्याचे समजते.
कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता थेऊर फाटा येथील एका पॅलेसमध्ये होत आहे. त्यामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस सुमारे ९९.२७ एकर जमिनीच्या विक्रीचा विषय आहे. त्यावर कारखाना सभासदांची जमीन विक्रीवरील भूमिका महत्त्वाची ठरणार असून, सभेत हा विषय गाजण्याची चिन्हे आहेत.