जालना : जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने मार्ग काढावा, असे निर्देश खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर येथील क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्तालयामध्ये आयुक्त कौशल सिंग यांच्यासोबत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी निवृत्तिवेतन, भविष्य निधी आणि इतर थकबाकीच्या प्रश्नांवर सखोल चर्चा केली. जालना सहकारी साखर कारखाना येथील अनेक कामगारांना भविष्यातील सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची विलंबामुळे अडचण निर्माण झाली आहे. कामगारांच्या मागणीनुसार २०२४ पासून सुरू असलेल्या प्रक्रियेत अनेक
कामगारांना अद्याप यूएएन क्रमांक मिळालेला नाही. यावर तातडीने कार्यवाही करावी. साखर कारखान्याने २०१० मध्ये भरलेली पाच कोटी ८३ लाख २२ हजार ३४२ रुपयांची रक्कम अजूनही कामगारांच्या खात्यात जमा झालेली नाही. ती त्वरित वर्ग करावी. न्यायालयाच्या निर्णयानुसार वाढीव पेन्शन मंजूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. कारखान्याने कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात केलेली पीएफ रक्कम दंड व व्याजासह भरावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती पुरवावी, असे निर्देश यावेळी खासदार डॉ. काळे यांनी दिले. यावेळी जालना साखर कारखान्याचे रामेश्वर डोंगरे, संतोष देशमुख, साहेबराव कांदे, दत्तू जुंबड, भिकाजी गवार, ज्ञानेश्वर औटे, एकनाथ पठाडे, अप्पासाहेब अवघड आदींची उपस्थिती होती.