आगामी दोन वर्षांत साखरेला जागतिक बाजारपेठेत वाढणार मागणी : साखर महासंघाचा अंदाज

पुणे : दुबई येथे नुकतीच चार दिवस साखर परिषद झाली. या परिषदेला जगभरातील शंभर देशांतून ९०० प्रतिनिधी उपस्थित होते. भारतातर्फे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, इस्मा व खासगी क्षेत्रातील इतर संस्थाचे प्रमुख सहभागी होते. या परिषदेत साखरेच्या जागतिक मागणीबाबत चर्चा झाली. ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व इतर देशांमधील ऊस व साखर उत्पादनाची स्थिती लक्षात घेता पुढील दोन वर्षे देशातील साखरेला श्रीलंका, अफगाणिस्तान, पूर्व आशिया, मध्य आखाती देशांमधून चांगली मागणी राहील अशी शक्यता राष्ट्रीय साखर महासंघाने व्यक्त केली.

याबाबत माहिती देताना साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आगामी खरीप हंगामात देशात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशात उसाचे उत्पादन वाढेल. साखर उत्पादनात वाढ होणार आहे. दुबईतील परिषदेत जागतिक स्तरावर साखर उत्पादनाच्या स्थितीबद्दल चर्चा करण्यात आली. यंदा भारतात घटणाऱ्या साखर उत्पादनाबाबतही चर्चा झाली. आगामी ऑक्टोबर २०२५ मधील साखर हंगामाबाबतही आढावा घेण्यात आला. नंतर भारतीय साखरेला अधिक मागणी असेल असे चित्र दिसून आले आहे. यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग व ऑस्ट्रेलियातील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचा अनुकूल परिणाम उभ्या उसाच्या वाढीवर आणि २०२६-२७ मध्ये नव्या ऊस लागणीवर होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे २०२५-२६ व २०२६-२७ या दोन वर्षांत भारतीय साखर उद्योगाचा जागतिक साखर बाजारामध्ये दबदबा निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here