सातारा : जिल्ह्यातील खासगी व सहकारी अशा एकूण १७ साखर कारखान्यांनी मिळून ८४,२२,६०८ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८०,३७,३४५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सर्वाधिक सरासरी ११.२९ टक्के साखर उतारा सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे, तर सर्वाधिक १३,४०,००० मेट्रिक टन ऊस गाळप जरंडेश्वर साखर कारखान्याने केले असून, रयत अथणी शुगरने १२.०८ टक्के साखर उतारा घेत आघाडी घेतली. आतापर्यंत किसन वीर, खंडाळा कारखाना, प्रतापगड-अजिंक्यतारा या तीन कारखान्यांनी गाळप संपुष्टात आले आहे. उर्वरित कारखाने मार्चपर्यंत चालतील अशी शक्यता आहे.
इतर जिल्ह्यांतील अनेक साखर कारखाने बंद झाले आहेत. यामुळे तेथील ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी कारखान्यांकडून प्रयत्न केले जात असल्याने मोठ्या गावात १० ते १५ मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्याने ऊस तोडणीस वेग आला आहे. जिल्ह्यातील खासगी कारखान्यांनी ४४,५९,७५१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३५,६४,२५५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.९९ टक्के आहे. सहकारी साखर कारखान्यांनी ३९,६२,८५७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४४,७३,९० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी ११.२९ टक्के साखर उतारा मिळालेला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याने सर्वाधिक ११,३४,९०० क्विंटल साखरेची निर्मिती करत आघाडी घेतली आहे, तर सर्वाधिक १२.०८ टक्के उतारा रयत अथणी शुगरला मिळाला आहे.