सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे यांच्या हस्ते ऊस गव्हाणीत शेवटची उसाची मोळी टाकून करण्यात आली. यावेळी संचालक मंडळातील सदस्यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याने गेल्या ९८ दिवसांत आठ लाख टन उसाचे गाळप केले आहे. ऊस गाळपात कारखाना जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर राहिला आहे तर साखर उताऱ्यात पहिल्या स्थानावर आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के असून, तो जिल्ह्यातील सर्वोच्च आहे.
कार्यकारी संचालक डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, कारखान्याचा आसवनी प्रकल्प व्यवस्थित सुरू असून, हा प्रकल्प साधारणतः तीन महिने चालणार आहे. को-जनरेशन प्रकल्प देखील अजून तीन महिने चालविला जाणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे, संचालक मंडळातील सदस्य आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही हा गाळप हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले. संचालक दिनकर मोरे, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभूते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, श्यामराव साळुंखे, सीताराम शिंदे, राणू पाटील, तज्ज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव आदी उपस्थित होते.