कोल्हापूर : मागील पाच वर्षे गुळाच्या उत्पादनात घट होऊन गुळ उद्योगाला घरघर लागली होती. पण, यावर्षी त्यात सुधारणा झाली आहे. चालू हंगामात आतापर्यंत झालेल्या आवकेत ५ टक्के जादा म्हणजे ५५ ते ६० हजार जादा गूळ रव्यांची आवक झाली आहे. हंगाम संपेपर्यंत ही वाढ १ ते दीड लाख जादा गूळ रव्यांची होईल, यामुळे समितीच्या गुळाच्या एकूण उलाढालीत २ कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा गुळाचा दरही प्रति क्विंटल ४१०० रुपयाच्या पुढे राहिला आहे.
एकेकाळी जिल्ह्यात १२०० ते १५०० गुऱ्हाळघरे होती, कालांतराने जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढीस लागली आणि गुऱ्हाळांची संख्या कमी होत गेली. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात १०० ते १२५ गुऱ्हाळघरे सुरू आहेत. यंदा आतापर्यंत बाजार समितीत १७ लाख ४५ हजार ३०० रव्यांची आवक झाली आहे. आणखी २५ ते ३० दिवस हंगाम चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी तीन ते साडेतीन लाख रव्यांची आवक होण्याची शक्यता आहे, असे या विभागाचे प्रमुख सहायक सचिव अनिल पाटील यांनी सांगितले.
यावर्षी १ नोव्हेंबरपासून गूळ हंगाम सुरू झाला आहे. पहिल्याच टप्यात ८० गुन्हाळे सुरू झाली होती. या गुन्हाळांवरून दररोज २५ ते ३० हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. हंगाम सुरू होऊन १२१ दिवस झाले आहेत. आतापर्यंत १७ लाख ४५ हजार ३०० गूळ रव्यांची आवक झाली आहे. यातून १८० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. हंगाम १५ मार्चपर्यंत चालेल, तोपर्यंत आजूनही तीन ते साडे तीन लाख टन गूळ रव्यांची आवक होईल, असे विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.