अमृतसर : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. दरम्यान, किसान सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्याच्या वितरणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला अन्नदात्यांचा अभिमान असल्याचे सांगितले. सोशल मीडिया ‘एक्स’वर त्यांनी म्हटले आहे कि, आम्हाला आमच्या अन्नदात्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. किसान सन्मान निधी शेतकऱ्यांचे कल्याण, आनंद आणि समृद्धी यांना प्राधान्य देते. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये एका जाहीर सभेला संबोधित देखील करतील. या रॅलीमध्ये सुमारे ५ लाख शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमात किसान सन्मान निधीचे वितरण आणि एक जाहीर सभा असेल. भारतीय जनता पक्षाचे नेते शाहनवाज हुसेन यांनी ‘एएनआय’ला सांगितले होते की, या रॅलीमध्ये एनडीएचे वरिष्ठ नेते आणि भागलपूर, मुंगेर, बेगुसराय आणि इतर १३ जिल्ह्यांमधील लोक उपस्थित राहतील. बिहार विधानसभेच्या सर्व २४३ मतदारसंघांसाठीच्या निवडणुका या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये झाल्या होत्या.