सांगली : गाळप हंगामातील अंतिम टप्प्यातही ‘कृष्णा’ काठावर अनेक ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. ‘कृष्णा’ काठावर कोयते अद्याप सुरू असून गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
हंगामाच्या प्रारंभी ऊस लवकर घालवण्याची शेतकऱ्यांना घाई झाली होती. याचा गैरफायदा घेत ऊस तोडणी मजुरांनी शेतकऱ्यांकडून पैसे उकळून ऊस तोडण्यास सुरवात केली. ऊस तोडणी मजूर, ट्रॅक्टर चालक उसाची ट्रॉली अडकली, तर ओढण्यासाठी दुसरा, तिसरा ट्रॅक्टर, कधी-कधी जेसीबीसाठी पैसे देऊन शेतकरी मेटाकुटीला आले. सुरवातीपासून उसाच्या वाढ्याचे दर प्रति शेकडा शंभर रुपये ठेवले. अखेरपर्यंत तोच राहिल्याने पशुपालक शेतकऱ्यांनाही चाऱ्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागले. तुलनेने ठरल्याप्रमाणे पेंढीत वाढ्याची संख्या कमी असल्याने तोही तोटा सहन करावा लागला. हार्वेस्टर यंत्राने मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी झाली. सध्या ऊस पेटवून तोडला जाऊ लागला आहे. त्यामुळे चाऱ्याचे संकट आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.