पुणे : महाराष्ट्रात चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये आतापर्यंत ५३ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. हे कारखाने कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या विभागांतील आहेत. याबाबत साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, २४ फेब्रुवारीअखेर महाराष्ट्रातील एकूण ५३ साखर कारखान्यांनी कामकाज बंद केले आहे. यामध्ये सोलापूरमधील ३६, नांदेडमधील पाच, कोल्हापूरमधील सहा, पुण्यातील चार, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर भागातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत राज्यात फक्त १७ कारखाने बंद झाले होते.
दरम्यान, राज्यात चालू हंगाम २०२४-२५ मध्ये साखरेचे उत्पादन ७३३.१ लाख क्विंटल (सुमारे ७३.३१ लाख टन) झाले आहे. गेल्या हंगामातील समान कालावधीत उत्पादित झालेल्या ८८८.०८ लाख क्विंटलपेक्षा हे उत्पादन कमी आहे. सध्या १४७ कारखाने ऊस गाळपाचे काम करत आहेत, तर ५३ कारखान्यांनी आपला गाळप हंगाम पूर्ण केला आहे. २४ फेब्रुवाअखेर, राज्यातील कारखान्यांनी ७८६.०२ लाख टन ऊस गाळप केला. मागील हंगामात समान कालावधीत ८९१.९७ लाख टन गाळप झाले होते. राज्याचा एकूण साखर उतारा ९.३३ टक्के आहे. गेल्या हंगामातील समान कालावधीतील ९.९६ टक्के उताऱ्यापेक्षा तो कमी आहे. साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, कमी उत्पादन आणि वाढत्या गाळप क्षमतेमुळे या हंगामात गिरण्यांनी लवकर कामकाज बंद केले आहे. गाळप हंगाम सुरू होण्यास झालेला उशीर, इथेनॉल उत्पादनाकडे ऊस वळवणे आणि उत्पादनात आलेली घट यामुळे राज्यात मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन कमी आहे.