पुणे : राज्यात उन्हाचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या किमान तापमानात वाढ झाली मात्र कमाल तापमान स्थिर पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने आजही कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. राज्यातील किनारपट्टीच्या भागात तापमानात सरासरी ४ ते ५ अंशाची वाढ झाली आहे.
मुंबईतील सांताक्रुझ येथे सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर डहाणू येथे ३८.२ अंश सेल्सिअस तापमान होते. रत्नागिरीतही ३७.२ अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यातील किमान तापमानात मात्र चांगलीच वाढ झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी १२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याला आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला. तर ठाणे जिल्ह्यासाठी उद्याही अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मार्चलाही उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला.