अहिल्यानगर : खासगी कारखान्यांच्या सर्टिफिकेटवर शेतकऱ्यांना ऊस पिककर्ज देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने महिन्यापूर्वी घेतला होता. मात्र, आता बँकेने हा निर्णय फिरवत शेतकऱ्यांना सर्टिफिकेटवर कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे, जिल्हा बँकेचा हा ठराव शेतकऱ्यांविरोधी असून शेतकरी संघटनांनी त्याचा तीव्र निषेध केला आहे. याबाबत सहकार मंत्र्यांकडे तक्रार करू असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र काळे यांनी दिला आहे. पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा. लि. आणि स्वामी समर्थ साखर कारखान्याविरोधात हा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत नरेंद्र काळे म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बँकांना शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी सिबिलचीसुद्धा अट घातलेली नाही. मात्र, जिल्हा सहकारी बँकेचा हा ठराव बेकायदा आहे. तो सहकारी साखर कारखान्यांना फायदा मिळवून देण्यासाठीच घेतला गेला आहे. नगर जिल्ह्यात खासगी कारखान्यांनी स्पर्धा वाढविल्याने ऊसदर वाढले आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. त्यामुळे सहकारी कारखान्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या कर्जावर अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.