कोल्हापूर: सद्यस्थितीत गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात असून कर्नाटक सीमाभागातील साखर कारखाने नुकतेच बंद झाले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद होतील अशी स्थिती आहे. उन्हाचा वाढलेला कडाका, सलग तीन महिने काम करून कंटाळलेले ऊस तोडणी मजूर आता गळीत हंगाम संपवुन गावी परतण्याच्या मानसिकतेत आहेत. अजूनही काही ठिकाणी ऊसतोड सुरू आहे. उन्हाचा कडाका आणि तोडणीसाठी फारसे मजूर नसल्याने शेतकरी ऊस जाळून कारखान्याला पाठवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कोल्हापूर विभागात दरवर्षी ऊसतोडणीसाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अहमदनगर, बीड, सांगोला, जत, परभणी, विजापूर लातूर, जालना, वाशीम, यवतमाळ आदी भागातून मजूर येतात. ऊस तोडणीसाठी पती-पत्नी मिळून एक कोयता या हिशेबाने १० ते १५ कोयत्यांच्या टोळीचा करार केला जातो. त्यासाठी वाहनमालक हंगामापूर्वी काही रक्कम उचल म्हणून देतात. मजुरांची कुटुंबे कारखाना कार्यस्थळावर झोपड्या बांधून राहतात. सध्या उन्हाचा कडाका सुरू झाला आहे. त्यातच खोडवा, निडवा उसाचा तोडणी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे उसाची भरती होत नाही. साधारणतः तीन ते साडेतीन महिने रात्रंदिवस ऊसतोडणी करून कामगार कंटाळले आहेत. त्यांना गावी जाण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.