सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेने आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे चालू केली आहे. कारखान्याची २२९ एकर जमीन आहे. बँकेचे संचालक मंडळ व नेतेमंडळी यांनी संगनमताने कारखान्याची मालमत्ता खासगी कंपनीच्या घशात घालण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
आमदार पडळकर यांनी ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर आहे, ती रद्द करण्यात यावी. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची विभागीय चौकशी चालू आहे. सहकार आयुक्तांनीही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चौकशीचे ताशेरे ओढले आहेत. नोकरभरती, फर्निचर खरेदी, संगणक खरेदी घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांच्या मालिकांची चौकशी सुरू असताना बँकेने माणगंगा सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. हे गैर आहे. ही प्रक्रिया तातडीने थांबवावी.