मुंबई : शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. २८ फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद झाले.सेन्सेक्स १,४१४.३३ अंकांनी घसरून ७३,१९८.१० वर बंद झाला, तर निफ्टी ४२०.३५ अंकांनी घसरून २२,१२४.७० वर बंद झाला.सेन्सेक्समधील घसरणीत टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, मारुती, एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टायटन यांचा मोठा वाटा होता. अमेरिकेने मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादल्याने जागतिक व्यापार युद्धाच्या शक्यतेमुळे शेअर बाजार निर्देशांक घसरले.
गुरुवारी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयातीवरील २५ टक्के शुल्क २ एप्रिलपासून नव्हे तर ४ मार्चपासून लागू होईल. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी चीनमधून आयातीवर अतिरिक्त १० टक्के शुल्क प्रस्तावित केले आहे. ट्रम्प यांनी केलेल्या कर आकारणीच्या घोषणांचा शेअर बाजारांवर जबर परिणाम होत आहे. चीननेही अमेरिकेवर कर लादण्याचा इशारा दिल्याचे वृत्त आहे. भारतातून परदेशी गुंतवणूकदार बाहेर पडत असल्यामुळेही देशांतर्गत शेअर बाजारांवरही दबाव पाहायला मिळत आहे.