पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील लेबर व टाइम ऑफिसमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी संचालक मंडळाने दोषींवर थेट निलंबनाचे हत्यार उपसले. संबंधीतांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, कारखाना प्रशासन यापुढील कारवाई काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही कारखान्यात अनेकदा चोरीचे गुन्हे घडले होते. परंतु, तात्पुरती मलमपट्टी करून त्यावर संचालक मंडळाने पांघरुण घातल्याचे दिसून आले आहे. काही प्रकरणांत निलंबनाचा फार्स केला गेला. काही प्रकरणांत वरिष्ठ मंडळींनीच दोषींना पाठीशी घालण्याचे काम केले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतील याची उत्सुकता सभासदांमध्ये आहे.
सोमेश्वर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने मोठी आर्थिक प्रगती केली आहे. मात्र, भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायम पाठीशी घालण्याचे काम संचालक मंडळाकडून केले जात असल्याचा आरोप सभासदांचा व विरोधी आघाडीचा आहे. यापूर्वी विरोधकांनी खत विक्री, मळी विक्री, ऊसबेणे गैरव्यवहार, वजनातील काटामारी, साखर चोरी, पेट्रोल पंप या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यावरही व्यवस्थापनाने फारशी कठोर कारवाई केलेली नाही. काहींची मनमानी वाढली असल्याचा आरोप आहे. अशा गैर प्रकारांमुळे कारखाना सध्या चर्चेत आला आहे. कारखान्याचे काही वरिष्ठ व संचालक आणि अधिकारी इतरांच्या नावे जोरात ठेकेदारी करत असल्याचा आरोप सभासद सातत्याने करत आहेत. नियमांना बगल देऊन इतरांच्या नावे कामे घेतल्याचे दाखवून येथे असा प्रकार सुरू आहे.