पुणे : राज्यातील चालू हंगाम २०२४- २५ मध्ये गाळप संपल्यानंतर पंधरा दिवसांत साखर कारखान्यांनी त्या हंगामातील साखर उत्पादनानुसार आलेला प्रत्यक्ष साखर उतारा व इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस, सिरप व बी हेवी मोलॅसिसच्या वापरामुळे, विक्रीमुळे साखर उताऱ्यात आलेली घट एकत्रित करून अंतिम साखर उतारा निश्चित करावा. त्याप्रमाणे उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा अंतिम एफआरपीची रक्कम देण्यात यावी अशी सूचना राज्याच्या साखर आयुक्तांनी केली आहे. साखर आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व प्रादेशिक साखर सह संचालक, विशेष लेखापरीक्षक वर्ग १ व कारखान्यांचे कार्यकारी संचालक व सरव्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत ६४ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत.
याबाबत साखर आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार, कारखान्यांनी इथेनॉल निर्मीतीसाठी उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसिसचा वापर केल्यामुळे आलेल्या साखर उताऱ्यातील घट केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या सक्षम संस्थांकडून प्रमाणित करून घेण्यात यावी. कारखान्यांनी या हंगामातील एफआरपी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना १०० टक्के अदा केल्याबाबत एफआरपी निरंक दाखला मिळण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित प्रादेशिक साखर सह संचालकांमार्फत साखर आयुक्तालयास सादर करावा. एफआरपी निरंक दाखला या कार्यालयातून मिळाल्यानंतरच साखर कारखान्यांना हंगाम २०२५-२६ करिता गाळप परवाना देण्यात येईल. अंतिम ऊस दर देण्यास विलंब होणार नाही, याची प्राधान्याने नोंद घ्यावी.