श्रीगोंदे : तालुक्यातील दोन सहकारी व दोन खासगी कारखान्यांपैकी कुकडी सहकारी साखर कारखाना या हंगामात चालू झाला नाही. नागवडे सहकारी कारखाना व ओंकार ग्रुपचे दोन खासगी अशा तीन कारखान्यांनी ऊसाचे गाळप केले आहे. तालुक्यातील या तीन साखर कारखान्यांनी आतापर्यंत पावणेतेरा लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. नागवडे कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता झाली असून ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण येथील कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगामात कारखान्यांकडून उच्चांकी ३,४०० रुपये प्रती टनापर्यंत दर मिळू शकेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात, कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षेहून कमी दर जाहीर करून अपेक्षांवर पाणी फेरले.
रविवारी तीन मार्च रोजी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ झाला. कारखान्याने आजअखेर ४ लाख ७५ हजार ८३४ टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यातून ५ लाख १६ हजार ५२५ साखर पोती उत्पादित केली आहेत. कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.९४ टक्के आहे. नागवडे ओंकार शुगर ग्रुपच्या हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने ७ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. या कारखान्याचा गाळप हंगाम बुधवारी, दि. ५ मार्च रोजी होणार आहे. तर देवदैठण येथील ओंकार साखर कारखान्याचे आतापर्यंत १ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून हंगाम १५ मार्चपर्यंत चालेल असा अंदाज आहे.