सांगली : क्रांती सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस हंगामाची सांगता झाली. मजुरांनी ऊस भरलेला ट्रॅक्टर सजवून गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. कृष्णा कालवा, गणेशनगर, तुकाई परिसरातील आठ ते दहा एकर ऊस क्रांती कारखान्याच्या वतीने तोडला. पंधरा ते वीस शेतकऱ्यांचे आठ-दहा एकरांतील ऊस तोडून नेऊन नुकसान टाळले. शेतकऱ्यांनी आमदार अरुण लाड, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचे आभार मानले.
गणेशनगर, तुकाई परिसरातील कृष्णा कालव्याखाली आठ-दहा एकर परिपक्व ऊस तोडणे बाकी होता. कृष्णा कालव्याच्या पाझरामुळे आठ-दहा एकर ऊस पिकात पाणी साचून राहिल्याने हंगाम संपत आला तरी ऊस तोडणे बाकी असल्याने उत्पादकांचे धाबे दणाणले होते. शेतकऱ्यांनी ‘क्रांती’चे कर्मचारी दिलीप मोरे, प्रकाश निकम यांना विनंती केल्यानंतर आमदार अरुण लाड, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्याकडे माहिती दिली. त्यानंतर संचालक जयप्रकाश साळुंखे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, कंत्राटदार संदीप शिंदे, सचिन शिंदे, अमोल शिंदे यांनी मदत केली.