पुणे : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीचे वारे सध्याला वेगाने वाहू लागले आहे. या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ही निवडणूक पूर्ण क्षमतेने लढविण्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या निवडणुकीतही लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणे बारामतीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केली. बारामतीत पक्षाच्या कार्यालयातील निवडणूक आढावा बैठकीत अनेकांनी सत्ताधारी संचालक मंडळाच्या कामाचे कौतुक केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमवारपासून माळेगाव, पणदरे, सांगवी, खांडज, नीरावागज आणि बारामती गटात प्रतिदिनी एक असा गटनिहाय सभासद संपर्क दौरा सुरू केला आहे. त्यापूर्वी बारामतीमध्ये पक्ष कार्यालयात आढावा बैठक झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, बाळासाहेब तावरे आदींनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी अनेकांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती ‘माळेगाव’च्या निवडणुकीतही करावी अशी मागणी केली. याबाबत उपमुख्यमंत्री व नेते अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले. कार्यकर्ते डी. डी. जगताप, महेश गावडे, शिवाजी खांबगळ, राजेंद्र भोईटे, तानाजी पवार, संतोष जाधव, सुरेश देवकाते, राजेंद्र जगताप आदी सभासदांनी भूमिका मांडली. तर प्रवीण देवकाते यांच्यासह काहींनी निवडणुकीत भाजपबरोबर तडजोडीला विरोध दर्शविला.