सांगली : कामगारांचा अभाव, सुरुवातीला दोन महिन्यांत दरात न झालेली समाधानकारक वाढ खर्चाचा ताळमेळ न बसल्याने शिराळा व लगतच्या शाहूवाडी तालुक्यातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेल्या गुऱ्हाळघरांनी आपल्या हंगामाची सांगता केली आहे. दरवर्षी ही गुऱ्हाळे पाडव्यापर्यंत सुरू असतात. यंदा महिनाभर अगोदरच कामकाज संपुष्टात आले आहे. वाढलेला ऊस दर, खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा हंगाम ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर संपल्याचे गुऱ्हाळ मालकांनी सांगितले.
शिराळा तालुक्यात गुऱ्हाळ उद्योगास अलीकडच्या काही वर्षात मरगळ आली आहे. तालुक्यातील कणदूर येथील सुभाष पाटील यांचे एकमेव गुऱ्हाळ यावर्षी सुरू होते. शाहूवाडी तालुक्यातील वारणापट्ट्यातील काही मोजक्याच गावात गुन्हाळातून गूळ उत्पादन झाले. शासनाने गुळ उद्योगासाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य केल्यास उद्योगाला गतवैभव प्राप्त होईल. गुळाला हमीभाव दिल्यास शेतकरी पुन्हा या उद्योगाकडे वळतील असे गुऱ्हाळ चालकांचे म्हणणे आहे. यंदा गुळाला सरासरी ३,८०० ते ४,५०० रुपयांपर्यंत सरासरी दर आहे. याबाबत कणदूरचे गुऱ्हाळमालक सुभाष पाटील यांनी विविध अडचणींमुळे हंगाम लवकर समाप्त केल्याचे सांगितले.