सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक असून कारखान्याचे सभासद स्वाभिमानी आहेत. कारखान्याचा भविष्यातील चेअरमन कोण असावा, हे तेच ठरवतील, असे माजी मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सह्याद्रि सहकारी कारखान्याच्या साखर पंचवार्षिक निवडणूकीकरीता माजी मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, कारखान्याची स्थापना स्व. यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. सुरुवातीपासून कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र विचारात घेऊन कारखान्याच्या माध्यमातून काही लिफ्ट इरिगेशन उभ्या केल्या आहेत. आरफळ कॅनॉल, हणबरवाडी धनगरवाडी योजनेच्या माध्यमातून पाण्याची सोय झाली आहे. या माध्यमातून उसाचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. गेली ५० वर्षे कारखान्याने सर्वसामान्य सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी युवा नेते जसराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.