पंजाब : गोल्डन गेट येथे शेतकऱ्यांचे आंदोलन, प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात

अमृतसर : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकरी अमृतसरमधील गोल्डन गेट येथे जमले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डीएसपी मनिंदर सिंग पाल म्हणाले कि, आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. दरम्यान, ‘एएनआय’शी बोलताना शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर म्हणाले की, राज्य सरकारच्या निषेधार्थ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे पुतळे जाळतील. पंढेर यांनी पंजाब पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्याची मागणीही केली.

किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते गुरबचन सिंग छाबा यांनी शेतकऱ्यांसोबतची बैठक अर्ध्यावर सोडल्याबद्दल मुख्यमंत्री भगवंत मान यांचा तीव्र शब्दात निषेध केला. ते म्हणाले, त्यांनी पहिल्यांदाच असा मुख्यमंत्री पाहिला आहे जो बैठक सोडून निघून जातो. ‘एएनआय’शी बोलताना छाबा म्हणाले, पंजाबमधील भगवंत मान सरकार शेतकऱ्यांसोबतची बैठक अर्ध्यावर सोडत निघून जाते. शेतकरी नेत्यांच्या घरांवर छापे टाकून त्यांना अटक केली जाते. आंदोलक शेतकऱ्यांनी पंजाब सरकारकडे सहा पिकांसाठी किमान आधारभूत किंमत लागू करण्याची, कर्जमाफी योजना सुरू करण्याची, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी देण्याची, निदर्शनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची, सरहिंद फीडर कालव्यावरील मोटारींचे वीज बिल माफ करण्याची आणि सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेसाठी एक उपसमिती स्थापन करण्यासह एकूण १८ मागण्या केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here